छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : निवृत्त शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. नागरिकांनी हिसका दाखवताच चोरट्याने खिशातून साखळी काढून दिली; मात्र पेंडल तेथेच पडल्याचा बहाणा करत त्याने चकवा देऊन तिथून काढता पाय घेतला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी शोधाशोध केली असता ८ ग्रॅमचे पेंडल मिळून आले आहे. जिन्सी परिसरातील श्रीनाथनगर भागात संतपुरे हॉस्पिटलजवळ १८ जुलै रोजी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास हा थरार घडला.
विजया ओमप्रकाश सोमदानी (७५, रा. श्रीनाथनगर, जिन्सी) या फिर्यादी आहेत. त्या निवृत्त
शिक्षक आहेत. त्या मैत्रीण अर्मिला लोया यांच्यासह संतपुरे हॉस्पिटलजवळील गार्डनसमोरून पायी घराकडे जात होत्या. तेव्हा चोरट्याने विजया सोमदानी यांच्या गळ्यातील चेन हिसकावली व पोबारा केला. सोमदानी यांनी आरडाओरड करताच परिसरातील नागरिकांनी चोराला पकडले. चोप देताच त्याने खिशातून सोमदानी यांची चेन काढून दिली. मात्र, त्यात सोन्याचे पेंडल नव्हते. सोमदानी यांनी त्याला पेंडल विचारले असता त्याने फक्त चेन असल्याची बतावणी केली. तसेच, पेंडल तेथेच पडल्याचा दावा करून ते शोधून देतो, अशी थाप मारली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. त्याच्याविरुद्ध ८ ग्रॅम सोन्याचे पेंडल चोरून पळल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












